वैकुंठ हे भगवान विष्णूंचे म्हणजेच परमेश्वर श्रीकृष्णांचे आध्यात्मिक स्थान किंवा निवासस्थान आहे. हे असे स्थान आहे जिथे जीव शाश्वत आनंद अनुभवतो. याउलट, भौतिक जगात, जिथे सध्या आपण आहोत, तिथे जीवाला जन्म, मृत्यू, जरा, आणि व्याधीच्या चक्रात अडकून राहावे लागते
हुशार व्यक्तीला भौतिक जगाबद्दल आणि स्वतःच्या मूळ अस्तित्वाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. जर तुम्ही ती हुशार व्यक्ती असाल आणि तुम्हाला या न संपणाऱ्या जन्म-मृत्यू-जरा-व्याधीच्या चक्रातून सहज, सोप्या मार्गाने मुक्ती मिळवायची असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा

आज आपण संत तुकाराम महाराजांचा तो अभंग पाहणार आहोत, जिथे महाराजांनी वैकुंठप्राप्तीचा सहज सोपा मार्ग सांगितला आहे. हा अभंग त्या वेळेचा आहे, जेव्हा तुकाराम महाराज स्वतः वैकुंठास गमन किंवा प्रस्थान करतात.
आम्ही जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥
तुमची आमची हे चि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥२॥
आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥३॥
येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥
रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥५॥

तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात जीवाचे मूळ स्थान कोणते आहे, याबद्दल माहिती देतात. ते या भौतिक जगाला — म्हणजेच जिथे आपण सध्या राहत आहोत त्यास — स्वतःचे गाव किंवा जन्मस्थान मानत नाहीत. या चरणात महाराज सूचित करतात की आपले मूळ जन्मस्थान वेगळे आहे.
या शाश्वत स्थानाबद्दल स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या १८व्या अध्यायाच्या ५६व्या श्लोकात माहिती देतात:
Bg. 18.56
सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रय: ।
मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥ ५६ ॥
“भगवान श्रीकृष्ण म्हणतात: माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला, तरी माझ्या आश्रयाखाली,
माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते.”
येथे ‘शाश्वत अविनाशी धाम’ म्हणजेच वैकुंठ होय.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात की ते वैकुंठास गमन करत आहेत. वैकुंठास प्रस्थान करत असताना ते सांगतात की एकदा का वैकुंठाची प्राप्ती झाली, की आपली या जन्म-मृत्यू-जरा-व्याधीपासून सुटका होते. “येथुनियां जन्मतुटी” चा अर्थ हाच आहे.
तुकाराम महाराज आपल्या विशुद्ध भक्तीमुळे आणि अभंगांमुळे खूप लोकप्रिय झाले होते. अशा थोर संताचा आपल्यापासून वियोग न व्हावा, असे त्यांच्या अनुयायांना आणि भक्तांना नक्कीच वाटले असेल. त्यामुळे लोकांनी त्यांना वैकुंठास जाऊ नका, अशी विनंती केली असणार.
त्यांच्या या विनंतीला तुकाराम महाराज पुढीलप्रमाणे उत्तर देतात:
“मी तुमच्या पायी लागतो, माझ्यावर दया करा आणि मला या भौतिक जगात राहण्याची विनंती करू नका. याउलट, जर तुम्हाला निजधामी म्हणजेच आपल्या हक्काच्या घरी जायचे असेल, तर ‘विठ्ठल-विठ्ठल’ म्हणा.”
तुकाराम महाराज पुढे सांगतात:
“राम आणि कृष्ण नाम असलेल्या मंत्राचा भक्तिभावाने उच्चार केल्यास मनुष्याला या भौतिक जगातून मुक्ती मिळते आणि भगवंताच्या शाश्वत धामाची प्राप्ती होते.”
तुकाराम महाराजांच्या शिकवणीतून आणि शास्त्रांच्या आधारावर आपल्याला एक मंत्र मिळतो, ज्याला शास्त्रात “महामंत्र” म्हटले जाते. तो मंत्र म्हणजे:
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ।।
सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!