संत तुकारामांनी हरिभक्ति आणि हरिनामाचे श्रेष्ठत्व याविषयी अनेक अभंग रचले आहेत, त्यातील एक अभंग आज आपण पाहणार आहोत.
लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥
कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥
सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरीनामें ॥३॥
तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ती । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥४॥
संत तुकाराम महाराज अत्यंत आदरपूर्वक आपणास विनवणी करतात की आपण अत्यंत आनंदाने व हर्षोल्लासाने हरिकीर्तन करावे हाताने टाळी वाजवत मुखी परमेश्वराचे नाम घ्यावे. महाराज म्हणतात – तुम्ही विठ्ठल विठ्ठल वेळो वेळा म्हणा कारण हा सुख सोहळा स्वर्गलोकातील जीवांना सुद्धा उपभोगता येत नाही. जेव्हा मनुष्य पुण्य कर्म करतो त्यावेळेस त्यास स्वर्गप्राप्ती होते, स्वर्ग लोकांमध्ये प्रवेश केल्यानंतर तो केलेल्या पूर्व कर्मामुळे सुख उपभोगत असतो. पण जीवाचे खरे शाश्वत सुख हे भौतिक वस्तू उपभोगण्यात नसून ते भक्ती मध्ये आहे; आणि भक्ती करण्यासाठी सर्वात सोपा सरळ मार्ग कोणता याबद्दल तुकाराम महाराज पुढील चरणात वर्णन करतात.

कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥
तुकाराम महाराजांनी या चरणात भगवंताची काही नावे दिली आहेत वास्तविक भगवंताची सहस्त्र नावे आहेत आणि त्यांच्या कोणत्याही नामाचा उच्चार भक्तीभावाने केल्यास मनुष्य अध्यात्मिक उन्नतीकडे अग्रेसर होतो. तुकाराम महाराज म्हणतात – भगवंताच्या नामोच्चाराने मनुष्य प्रामाणिकपणे वैकुंठाकडे प्रस्थान करू शकतो. येथे आपण समजून घेतले पाहिजे की जेव्हा आपण फक्त पुण्य कर्म करतो तेव्हा आपण स्वर्ग लोकांत प्रवेश करतो पण जेव्हा आपल्या पुण्यकर्माचा संचय कमी होतो तेव्हा आपणास पुन्हा या भौतिक जगामध्ये प्रवेश करावा लागतो; पण वैकुंठ म्हणजे साक्षात श्रीकृष्णांचे धाम – जेथे भगवान श्रीकृष्ण नित्य निवास करतात ते स्थान आणि अशा या वैकुंठाची प्राप्ती जेव्हा एक जीव करतो तेव्हा तो भौतिक जगापासून आपली सुटका करवून घेतो.

तुकाराम महाराज आपणास भक्ती मार्गाने वैकुंठाची प्राप्ती कशी करता येईल याबद्दल उपदेश करतात, पुढील चरणात महाराज म्हणतात –
सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरीनामें ॥३॥
मनुष्य मग तो कोणत्याही वर्णाश्रमामध्ये असेल त्या सर्वांना भगवंतांचे पवित्र नाम घेण्याचा अधिकार आहे आणि असे पवित्र नाम घेतल्याने त्याचा उद्धार होतो श्रीमद्भागवत महापुराण मध्ये आलेल्या वर्णनाप्रमाणे ४ युगे आहेत आणि प्रत्येक युगामध्ये श्रीकृष्ण अवतार घेतात.
सत्ययुग – या युगाचा कालावधी १७ लाख २८ हजार वर्षे इतका आहे आणि या युगामध्ये आत्मसाक्षात्काराचा मार्ग म्हणजे भगवान विष्णूंवर ध्यान करणे.
त्रेतायुग – या युगाचा कालावधी १२ लाख ९६ हजार वर्षे इतका आहे आणि या युगामध्ये यज्ञाच्या स्वरूपाने आत्मसाक्षात्कार होतो.
द्वापरयुग – ह्या युगाचा कालावधी ८ लाख ६४ हजार वर्षे इतका आहे आणि ह्या युगामध्ये भगवंतांच्या मूर्ती पूजेद्वारे आत्मसाक्षात्कार होतो.
कलियुग – आता आपण कलियुगामध्ये आहोत आणि या कलियुगाचा कालावधी ४ लाख ३२ हजार इतका वर्षे इतका आहे, ह्या कलियुगात जेथे अधर्म सर्वात जास्त आहे जेथे मनुष्य खूप आळशी आहे जेथे खूपच दुर्मिळ लोकांना भगवद्दामप्राप्ती होते; अशा या युगामध्ये आत्मसाक्षात्काराचा मार्ग म्हणजे भगवंतांच्या पवित्र अशा नामाचे उच्चारण.
तुकाराम महाराज या चरणात हेच सांगतात की कलियुगामध्ये उद्धार हा हरिनामाने होतो.

शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात –
तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ती । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥४॥
मुक्ती या ४ प्रकारच्या असतात – सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता आणि या चारही मुक्ती मनुष्य केवळ हरीच्या नामोच्चाराने प्राप्त करू शकतो.
सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!