आपणास दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे आणि याचा उपयोग करून आपण या भौतिक अशाश्वत जगातून शाश्वत अशा अध्यात्मिक लोकांत प्रवेश करू शकतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात –
क्षणक्षणा हाची करावा विचार । तरावया पार भव सिंधु ।।१।।
नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ।।२।।
संत समागमी धरावी आवडी । करावी तातडी परमार्थाची ।।३।।
तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे । नका डोळे धुरे भरुनी राहो ।।४।।
अभंगाच्या पहिल्या चरणात संत तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याने भवसिंधु म्हणजेच संसार रुपी सागरातून बाहेर पडण्याचा वेळोवेळी विचार केला पाहिजे कारण हा संसार किंवा मृत्यूलोक हा दुःख देणारा आहे आणि या भौतिक जगांत आपण जन्म-मृत्यू-जरा-व्याधीच्या चक्रात अडकून राहतो.
भगवद्गीता – अध्याय ८ श्लोक १५ मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना या भौतिक जगाला “दु:खालयमशाश्वतम्” संबोधतात.
मामुपेत्य पुनर्जन्म दु:खालयमशाश्वतम् ।
नाप्नुवन्ति महात्मान: संसिद्धिं परमां गता: ॥
आपणास माहित आहे – जेथे पुस्तके मिळतात त्याला आपण पुस्तकालय म्हणतो, जेथे विद्या मिळते त्याला आपण विद्यालय मिळतो, त्याचप्रमाणे जेथे दुःख मिळते ते म्हणजे दुःखालय, आणि हे दुःखाचे घर असून सुद्धा शाश्वत नाही – अशाश्वतम.
विष्णू भगवान या भौतिक जगाची निर्मिती करतात तर शंकर भगवान या भौतिक जगाचा संहार करतात.

अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज आपणास चेतवणी देतात की आपणांस मिळालेले शरीर हे नाशवंत आहे आणि कधी ना कधी ते आपण सोडणार आहोत. या देहाचे आयुष्य कमी करण्याचा प्रयत्न काळ किंवा वेळ करते आहे.
तिसऱ्या चरणात संत तुकाराम महाराज आपणास संतांचे संगतीत राहून परमार्थ किंवा आध्यत्मिक ज्ञान आत्मसात करण्याबद्दलचे उपदेश करतात. भौतिक ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपणास शिक्षकाची गरज असते, त्याचप्रमाणे उच्चतर आध्यत्मिक ज्ञान ग्रहण करण्यास मदत करणारे शिक्षक म्हणजे संत. या चरणात आलेला “तातडी” हा शब्द खूप महत्त्वाचा आहे.
आपण समजतो की भक्ती करण्याचं अजून माझं वय नाही किंवा आपण भक्ती नंतर करू शकू. पण आपण समजून घेतलं पाहिजे की हे जीवन खूप छोट आहे आणि हे असं असतानाच ते अनिश्चित पण आहे. याचा अर्थ की आपण सांगू शकत नाही की आपण किती काळ जगू, हे एवढं साधे सत्य आपण विचारात घेत नाही. उद्याचा दिवस पाहू की नाही याची अनिच्चीतता असताना सुद्धा आपण पहाटेचा अलार्म लावून झोपतो.
भगवद्गीता – अध्याय ८ श्लोक ५ मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात –
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय: ॥
अंतकाळी म्हणजेच मरणाचे वेळी जो माझे स्मरण करीत देह त्याग करतो, तो भगवंतांचे नित्य धाम किंवा वैकुंठाची प्राप्ती करतो, यात मुळीच शंका नाही.

पण अंतकाळी भगवंतांचे स्मरण होण्यासाठी जन्मभर आपणास त्याचा सराव करावा लागेल, हेच विचारात घेऊन तुकाराम महाराज परमार्थ हा तात्काळ करण्याचा विषय आहे हे सांगण्यावर भर देतात. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात इहलोक व्यवहार म्हणजे त्या गोष्टी ज्या भगवतभक्तीशी निगडित नाहीत त्याकडे लक्ष देऊन आपल्या डोळ्यात अज्ञानाचा धूर होऊ देऊ नये.
सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!