एखाद्या व्यक्ती कितीही साधना करत असेल, नानाविध यज्ञ करत असेल, पण जर ती व्यक्ती स्वतःचा भगवंतापासून दुरावा अनुभवत नाही तोपर्यंत त्यास खरा भक्त समजता येणार नाही. संत तुकाराम महाराज हे भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठलाचे विशुद्ध भक्त होते, त्यांच्या काही अभंगात त्यांची भगवंतभेटीची असणारी तळमळ किंवा ओढ दिसून येते, आज जो अभंग आपण पाहणार आहोत त्यात संत तुकारामांचे भगवंतांप्रती असलेले उच्चकोटीचे प्रेम दिसून येते.
कन्या सासुर्यासि जाये ।
मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा ।
केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥
चुकलिया माये ।
बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
जीवना वेगळी मासोळी ।
तैसा तुका म्हणे तळमळी ॥३॥
संत तुकारामांच्या काळी म्हणजेच १७ व्या शतकात मुलींची लहान वयामध्येच लग्न होत असत, मुलगी ज्यावेळी लग्नानंतर सासरी जाण्यास निघते तेव्हा तिच्या मनाची जी घालमेल होते अशीच अवस्था संत तुकारामाची होत असे. तुकाराम महाराज म्हणतात – ज्याप्रमाणे एखादी मुलगी सासरला जाताना तिच्या मनात आपल्या कुटुंबाप्रती जी विरहाची भावना निर्माण होते तशीच भावना माझ्यातही निर्माण झाली आहे. हे विठ्ठला ! हे केशवा ! तू मला कधी भेटशील ते सांग.

ज्याप्रमाणे एखाद छोट मुलं आई जेव्हा त्याच्या नजरेआड होते तेव्हा ते इतरत्र कावरेबावरे होऊन आईला शोधत असते, त्याप्रमाणे तुकाराम महाराजांची अवस्था हि त्या लहान बाळासारखे झाली जे आपल्या आईपासून कदापि वेगळे राहू शकत नाही.

शेवटच्या चरणात संत तुकाराम म्हणतात – मासा पाण्याबाहेर येताच तो ज्याप्रकारे तळमळत असतो त्याचप्रमाणे माझीहि अवस्था झाली आहे. मी सुद्धा तळमळतो आहे कारण माझा प्राण माझ्या पांडुरंगाची मला भेट घडत नाहीये.

विरहाची भावना ही भगवदप्रेमाच्या अधिक जवळ पोहोचवण्यास मदत करते. आध्यात्मिक जगतातच नव्हे तर भौतिक जीवनातही जेव्हा आपली एखादी प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर होते तेव्हा त्या व्यक्ती प्रती आपले प्रेम वाढत जाते.

चला तर हरिनाम घेऊन, हरीकीर्तन करून भगवंताप्रति प्रेम वाढवूया.
सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!