आम्ही तेणे सुखी – छ. शिवाजी महाराज आणि संत तुकारामांची भेट


Posted on March 22, 2025 by Ajay Salunkhe

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगांतून त्यांचे भगवंतांविषयी असलेले प्रेम स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी त्यांच्या अभंगातून लोकांना समजेल अशा भाषेत अध्यात्म सोपं केलं. आपण हे एक शरीर नसून एक आत्मा आहोत आणि भगवंताची सेवा करणे हे आपले मूळ कर्तव्य आहे, असे त्यांनी शिकवले. मनुष्याने शरीराभोवतीच्या मोहात न अडकता या दुर्मिळ मानव जन्माचा उपयोग भौतिक जगातून मुक्त होण्यासाठी केला पाहिजे, आणि हे साध्य करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण.

भगवंताची प्राप्ती करण्यासाठी संन्यास आश्रम स्वीकारण्याची गरज नाही. तुकाराम महाराजांनी दाखवून दिलं की गृहस्थ असतानाही, गृहस्थाश्रमात राहून आपण भगवंताची उत्तम भक्ती करू शकतो. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून समाजाला असे अनेक उपदेश दिले.

तुकाराम महाराजांची ख्याती ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली. एके दिवशी शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांसह संत तुकाराम महाराजांच्या घरी पोहोचले. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांच्या सोबत मौल्यवान दागिने आणि वस्त्रे नेली होती. त्यावेळी शिवाजी महाराज म्हणाले, “महाराज, तुमची ख्याती ऐकून तुम्हाला भेटायला आलो आहे. तुम्ही करत असलेल्या धर्मकार्याने मी खूप प्रभावित झालो आहे, आणि मी तुम्हाला यासाठी मदत करू इच्छितो. मी आणलेल्या धनाचा तुम्ही स्वीकार करावा.” असं म्हणत शिवाजी महाराज भक्तिभावाने संत तुकारामांच्या चरणी नतमस्तक झाले.

मुळात तुकाराम महाराजांना ऐश्वर्य आणि संपत्तीबद्दल आकर्षण नव्हते. तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना या पुढील अभंगातून उपदेश करतात – 

आम्ही तेणें सुखी | म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ||१||
तुमचे येर वित्त धन | तें मज मृत्तिकेसमान ||धृ||
कंठीं मिरवा तुळसी | व्रत करा एकादशी ||३||
म्हणवा हरीचे दास | तुका म्हणे मज हे आस ||४||

महाराज म्हणतात – “अहो शिवराय, तुम्ही मला खुश करण्यासाठी आलेले आहात हे मला माहित आहे, पण माझं सुख हे धनात नाही. जर तुम्ही खरोखरच मला खुश करू इच्छित असाल, तर भगवंताचं नामस्मरण करा, विठ्ठलाचं नाव घ्या, त्यातच आम्ही संतुष्ट होऊ. तुम्ही आणलेल्या मौल्यवान वस्त्रं आणि दागिन्यांची मला काही गरज नाही; ती आमच्यासाठी मातीसमान आहेत.”

तुकाराम महाराजांनी पुढे म्हटलं, “तुम्ही तुमच्या गळ्यात तुळशीमाळ धारण करा, आणि एकादशीचं व्रत पाळा. स्वतःला हरीचा दास म्हणून घ्या, हेच माझं तुमच्याकडे मागणं आहे.” तुकाराम महाराजांच्या या उपदेशाचा शिवाजी महाराजांवर खूप मोठा परिणाम झाला. पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी मांसाहाराचा त्याग केला आणि गळ्यात तुळशीमाळ धारण केली.

हा प्रसंग आपल्याला शिकवतो की, आपण कोणत्याही गोष्टीकडे आकर्षित न होता आपल्या अध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष दिलं पाहिजे. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संवादातून एकादशी व्रताचे महत्त्वही आपल्यासमोर येतं. उपवासाचे अध्यात्मिक महत्त्व तर आहेच, पण आता अनेक वैज्ञानिक संशोधनात उपवासाचं शारीरिक महत्त्वही पुढे येत आहे.


सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!

 


अभंगवाणी

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ajays Blog