आपणास दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे आणि या मनुष्य जन्माचा उपयोग करून आपण शाश्वत भगवतधामाची म्हणजेच वैकुंठाची प्राप्ती करू शकतो. आज जो अभंग आपण पाहणार आहोत त्यामध्ये संत तुकाराम महाराज मनुष्य जन्माचा उपयोग भक्तीमध्ये कसा करावा किंवा या अनमोल आयुष्याचा नाश न करण्याबद्दलचे उपदेश करतात.
महाराज पुढीलप्रमाणे उपदेश करतात –
आतां तरी पुढें हाचि उपदेश ।
नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पायां माझें दंडवत ।
आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥
हित तें करावे देवाचें चिंतन ।
करूनियां मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार ।
करा काय फार शिकवावें ॥३॥
हितोपदेशाच्या एका श्लोकात म्हटले आहे –
आहार निद्रा भय मैथुनं च
सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् ।
धर्मो हि तेषामधिको विशेष:
धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥

आहार – शारीरिक भूक भागवण्यासाठी मनुष्य आहाराची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे प्राणी सुद्धा आहाराची व्यवस्था करतात.
निद्रा – शारीरिक व मानसिक थकवा घालवण्यासाठी मनुष्य निद्रा किंवा झोप घेतो त्याप्रमाणे प्राणी सुद्धा झोप घेतात.
भय – मनुष्यात भय वाटते आणि भीतीपोटी तो वेगवेगळ्या साधनांचा वापर करून स्वतःचा बचाव करतो त्याचप्रमाणे भयावर नियंत्रण व आत्म संरक्षण हे प्राण्यातही आहे.
मैथून – मनुष्य मुलांना जन्म देतो त्याचप्रमाणे प्राणी सुद्धा पिल्लांना जन्म देतात.
या सर्व गोष्टी मनुष्य आणि प्राण्यांत सारख्या आहेत, यामध्ये मनुष्याला भले चांगल्या सुविधा आहेत जसे – प्राणी जमिनीवर, झाडांवर मिळेल त्या जागी झोपतात तर मनुष्य मऊ गादीवर झोपत असेल, प्राण्यांकडे निवडक आहाराचे पर्याय आहेत तर मनुष्य चवी नुसार अन्न प्रश्न करतो. हे जरी असले तरी मूळ कार्यत् तर दोघांना सारखेचं आहेत.
धर्मपालन हा मनुष्य आणि प्राण्यांमध्ये फरक आहे. धर्मपालन करून मनुष्य भगवंतांप्रती चौकशी करू शकतो जसे की – भगवंत कोण आहेत? आपण कोण आहोत? आपला व भगवंतांचा संबंध काय? आपण भगवंतप्राप्ती कसे करू शकतो? हे प्रश्न मनुष्याला पडतात व मनुष्य या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
तुकाराम महाराज अभंगातून हेच सांगतात की आपण मनुष्य जन्माचा नाश न करता म्हणजेच मनुष्यजन्म हा प्राण्यांप्रमाणे वाया न घालवता त्याचा उपयोग भगवत प्राप्तीसाठी केला पाहिजे. पुढे तुकाराम महाराज विनवणी करतात की मनुष्याने आपले चित्त शुद्ध व मन भगवंतावर एकत्रित करून देवाचे चिंतन व नामोच्चारण केले पाहिजे. अभंगांमध्ये आलेल्या “व्यापार” या शब्दाचा अर्थ आहे “कार्य”. सफल व्यापार किंवा सफल कार्य तेच ज्यातून आपणास फायदा होईल. संत तुकाराम महाराज म्हणतात भगवंतांप्रती केलेल्या कार्यातून आपल्याला लाभ होतो.
सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
राम कृष्ण हरी!